"नर्मदे हर!"
हे केवळ दोन शब्द नाहीत, तर तो एक प्रवास आहे – स्वतःकडून स्वतःकडे जाण्याचा.
तसं पाहिलं तर कितीतरी आहे या विषयावर लिहून ठेवण्यासारखं, बोलण्यासारखं आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर काहीच नाही बोलण्यासारखं. अनुभव हा शब्दातीत असतो. तुम्ही जितका तो शब्दात पकडून ठेवायचा प्रयत्न करतात तितका तो हातातून निसटून जातो. पण तरीही या गेल्या चार पाच महिन्यात नर्मदा माईच्या परिक्रमेचा जो आनंद अनुभवला त्याचा पुनःप्रत्यय यावा , येत राहावा हा मोह मात्र आवरत नाही म्हणून मग हे लिहून ठेवत आहे.
जेवढे जमेल तेवढं.
जसं जमेल तसं.
हे संपूर्णपणे स्वांत:सुखाय आहे. इथं कोणाला काहीही पटवून देण्याचा, काहीही सल्ला देण्याचा, मार्गदर्शन करण्याचा काहीही उद्देश नाही.
जेव्हा मी नर्मदा परिक्रमेचा संकल्प सोडला, तेव्हा मला वाटले होते की मी एका नदीच्या काठाने चालणार आहे. पण आज मागे वळून पाहताना जाणवते की, ती केवळ एक नदी नव्हती, ती एक जिवंत ऊर्जा होती आणि तो प्रवास केवळ एक मार्ग नव्हता, तर ती एक कठोर 'तपस्या' होती.
प्रवास की तपस्या?
आपण सहलीला जातो तेव्हा सोयी-सुविधा शोधतो, माझ्या मित्रांना स्विमिंग पूल लागतो, काही मित्रांना डोंगर लागतात, काही मित्रांना उत्तम रेस्टॉरंट आणि खाण्यापिण्याची चैन लागते. मला स्वतःला एक तर समुद्र हवा असतो नाहीतर बर्फाच्छादित हिमालयाची शिखरे.
पण परिक्रमित यातलं काहीच नव्हतं कारण परिक्रमा ही काही सहल नव्हे. परिक्रमेत आपण 'स्वतःला' शोधतो. नर्मदा परिक्रमा हा जगातील असा एक प्रवास आहे जिथे तुम्ही जिथून सुरू करता, तिथेच परत येता. हे वर्तुळ पूर्ण करणे म्हणजे केवळ जमिनीवरून, नदीच्या काठाकाठाने टाईमपास करत गाणी ऐकत चालणे नव्हे, तर आपल्या अहंकाराचे वर्तुळ छेदणे हे आहे.
जेव्हा तुम्ही खांद्यावर आठ दहा किलो ची ट्रेकिंग बॅग घेऊन, साधीशी चप्पल घालून , साध्या वेशात मैलोन्मैल चालता, तेही एकटे संपूर्ण एकांतात, कोणी मित्र नाही की काही नाही तेव्हा निसर्ग तुमच्यासमोर उभा राहतो. कधी रणरणते ऊन, तर कधी बोचरी थंडी; कधी घनदाट जंगलातली शांतता, तर कधी नदीच्या पात्राचा खळखळाट. या प्रवासात तुमच्याकडे 'नियोजन' नसते, असते ती फक्त 'श्रद्धा' आणि नर्मदामाईवरचा अतूट विश्वास.
अंतर्यात्रेची सुरुवात
परिक्रमे चालायला सुरुवात केलं की सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट लक्षात येते की म्हणजे आपल्या गरजा किती मर्यादित आहेत आणि आपण किती वाढीव फाफट पसारा वाढवत बसलो आहोत आयुष्यात.
एक ट्रेकिंगची सॅक. ते सुद्धा सोय म्हणून तुम्हाला झोळी जमत असेल तर झोळी. त्यानंतर गुंडाळायला दोन धोतरे वर घालायला दोन पांढरे शुभ्र कपडे, एक स्लीपिंग बॅग, एक स्वेटर, एक कानटोपी, गरजेची काही मोजकी औषध आणि पूजेचे साहित्य.
आणि आता व्यसन लागून गेले आहे म्हणून मोबाईल. (आमच्या एका मित्राची आजी मोबाईलला कर्णपिशाच्च असे म्हणायची तेव्हा मी खूप हसायचो पण आता काय बोलायची सोय राहिली नाहीये. या कर्णपिषाच्याने फक्त कानच नव्हे तर डोळे, हात , अंगठा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन असं सगळंच झपाटून टाकलं आहे. एकट्या दुकाट्याचे नव्हे सगळ्यांचेच. ज्यांना अजून दांतही आले नाहीत अशा बोंबड्या बाळांपासून ते ज्यांचे 32 च्या 32 दात पडून त्या जागी कवळी बसवली आहे अशा वृद्धांचे देखील. )
बस झालं तर इतकं पुरेसं आहे आयुष्य जगायला. इतक्या मर्यादित आहेत आपल्या गरजा परिक्रमेसाठी इतक्या कमी गोष्टींची गरज आहे पण खरी गरज आहे ती म्हणजे निष्ठेची. श्रद्धेची. भक्तीची.
मैय्येचे दर्शन आणि मानवी नाते
परिक्रमेच्या या चार-पाच महिन्यांमध्ये मला हजारो चेहरे भेटले. कुणी अनोळखी व्यक्ती येऊन पाणी पाजते, कुणीतरी हक्काने जेऊ घालते, तर कुणी फक्त 'नर्मदे हर' म्हणून पुढच्या प्रवासाला बळ देते. इथे जात, पात, श्रीमंती-गरीबी सगळं गळून पडतं. उरतो तो फक्त एक 'परिक्रमावासी' आणि समोर असते ती 'मैया'.
नर्मदेचे पाणी केवळ तहान भागवत नाही, तर ते मनातील गोंधळ शांत करते. जेव्हा तुम्ही तासनतास पात्राकडे बघत बसता, तेव्हा तुम्हाला शब्दांची गरज उरत नाही. तिथे फक्त 'मौन' बोलते. आणि हेच मौन मी जमेल तितक जमेल तसे शब्दांमध्ये भाषांतरित करून लिहायचा प्रयत्न करत आहे.
ही तर केवळ सुरुवात आहे...
परिक्रमा सुरू करताना माझ्या मनात विचार आलेला की आपणही कुलकर्णींच्या सारखे मोबाईल वगैरे सगळे घरी टाकून संपूर्ण एकांतात परिक्रमा करावी काय पण नंतर मनात दुसरा विचार आला की काय माहित आपल्याला यानंतर परिक्रमा कधी घडेल त्यामुळे मग ठरवले की मोबाईल घेऊन जायचे जमेल तितके जमेल तसे हा अनुभव हा आनंदाचा खजिना साठवत राहायचे आणि तेच मी करत गेलो परिक्रमेमध्ये कसे काय देव जाणे पण मैयाच्या कृपेने असेल कदाचित मला याचा कधीच माझ्या साधनेमध्ये अडथळा आला नाही. जिथे जिथे सुंदर दर्शन होत गेले तिथे तिथे मी फोटो व्हिडिओ काढत गेलो..
माझ्याकडे तब्बल ४०००+ फोटो आहेत, तासनतास व्हिडिओ आहेत आणि शेकडो ऑडिओ नोट्स आहेत. जमेल तितकी जमेल तेवढे मी माझा अनुभव कैद करून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तो आता इथे लिहून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
पण त्या फोटोंमध्ये कैद न झालेली एक गोष्ट म्हणजे – माझ्या आत झालेला बदल. ही परिक्रमा माझ्यासाठी एक अशी शाळा ठरली जिथे पुस्तके नव्हती, पण धडे मात्र आयुष्यभराचे मिळाले.
या ब्लॉगच्या माध्यमातून मी मलाच आलेल्या त्या शब्दातील आनंदाचा पुनःप्रत्यय घेण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या सोबतीने कदाचित तुम्हालाही तो जाणवेल. त्या जंगलातल्या रात्री, त्या टेकड्यांवरचा सूर्योदय, आणि मैय्येच्या काठावर मिळालेले ते 'मोक्ष' सुख... हे सर्व मी यथाशक्ती यथाकाल लिहून ठेवत आहे. अर्थातच वर म्हणल्याप्रमाणे हे स्वांत सुखाय आहे इथे कोणाला काही पटवून देण्याचा उद्देश नाही त्यामुळे मला कसलीही गडबड नाही.
पुढच्या भागात: परिक्रमेची पूर्वतयारी , काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न , परिक्रमाची सर्वसाधारण माहीती वगैरे वगैरे . आता हे सगळे एका पोस्ट मध्ये लिहिले तर टी मोठ्ठी पोस्ट होईळ म्हणून छोट्या छोट्या पोस्ट लिहीत जाईन … बघू, जशी मैय्या बुध्दी देईल तसे .
"नर्मदे हर!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा